अरुण

अरुण

पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची
कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?
पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं.
हषनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं,


क्षितिजाची कड सारविली ही उज्ज्वल दीप्तीनें,
सृष्टिसतीनें गळां घाललें कीं अनुपम लेणें ?
हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,
रम्य मेघ हे कितेक नटके मिश्रित रंगांहीं,


उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,
कुणीं लाविला विशुद्ध कर्पुररस अपुल्या अंगा ?

अरुण चितारी, नभ:पटाला रंगवितो काय ?
प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय ?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनीं ?


दिवसयामिनीं परस्परांचें चुंबन घेतात –
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत !
स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडळांत
रात्रीला शेवटचीं मंगल गीतें गातात ?


किंवा ‘माझी चोरुनि नेली मोत्यांची माला’
म्हणुनि नभ:श्री रुसली, आली लाली गालांला ?
कीं रात्रींचें ध्वांत पळालें, आशेची लाली
उत्साहाशीं संगत होऊनि ही उदया आली ?


किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया,
कीं आपणांवर आज पातली हीच खरी विजया ?
कीं स्वर्गींच्या दिव्यांचें हें फुटलें भांडार,
जणूं वाटतें स्वर्गच त्यासह खालीं येणार !


प्रगट जाहलें श्रीरामाचें पुष्पक किंवा हें ?
कीं सोन्याची पुरी द्वारका लखलखते आहे ?

“तेजानें न्हाणितें जगाला कोण सखे बाई ?
नवल अगाई ! तेजोमय तूं ? तेजोमय मीही !”
परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनीं
“विरहकाल संपला गा गडे प्रेमाचीं गाणीं !


या मेघाच्या कुंजामध्यें ही लपली कोण ?
तिला बोलवा – पुरे गडे ग ! हा तुमचा मान !
अम्ही गवळणी हृदयरसांनीं पूजूं प्रेमाला,
प्रेमकाल हा ! म्हणोत कोणी अरुणोदय याला,


पूर्वदिशेशीं गोफ खेळतो कृष्णागडी बाई !
उधळित सोनें सर्व तयाच्या लागूं या पायीं,
मधुस्मितानें विश्व भरूं ग ! शंकित कां म्हणुनी ?
सर्व सारख्या ? हांसावें मग कोणाला कोणीं ?”


गोफ चालला गगनमंडळीं, रंग नवा आला,
त्यांत लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाला,
विनयवती ती पूर्वदिशा मग अधोवदन झाली,
तों प्रेमाची अदभुत लहरी वसुधेवर आली !

या प्रेमाच्या लाटेखालीं मस्तक नमवावें,
हें आम्हांला, ब्रम्हांडाला, देवाला ठावें,
परंतु ही बघ भूदेवी तर वेडावुन गेली,
टकमड पाहत स्वस्थ बैसली या मंगल कालीं !


दंवबिंदूचा – नव्हे नव्हे ! हा  पडदा लज्जेचा –
मुग्धपणाचा, बालपणाचा, कोमल हृदयाचा –
निजवदनाहुनि या प्रौढेनें दूर पहा केला,
योग्यच अथवा, प्रेम न मोजी क्षुद्र लौकिकाला !


प्रेमातिशयें मला वाटतें विसरुनि जाहल ही
प्रिय नाथाचा आगमनोत्सव हा मंगलदायी,
कविते ! तिजला साहय तूंच हो, तूंही पण वेडी !
परंतु वेडाविण सुटतिल का हृदयाचीं कोडीं ?


जा जा ! आतां लाजुं नको ग ! पाहुं नको खालीं !
लाजच अथवा – खुलशिल तूंही या मंगल कालीं,
या लज्जेनें कविमानस हें होऊनियां लोल,
प्रेमचंचले ! प्रेमच तुजवर मग तें उधळील !


प्रेमावांचुनि फेड कशानें प्रेमाची व्हावी ?
हा बघ सविता प्रेमळ भूतें प्रेमानें नटवी !

हा प्रेमाचा लोंढा वरुनी आला हो आला
भव्य गिरींनो ! निजशिखरांवर झेलुनि घ्या याला,
नील झग्याला वेलबुटी तो तुमच्या चढवील,
‘निगा रखो !’ येईल तुम्हांला सरदारी डौल !


कविवाणीचा स्फूर्तियुक्त मग होतां अभिषेक,
तट्स्थ होऊनि तुम्हांस बघतिल हे सारे लोक !
सुवासिनींनो, वनदेवींनो, डोला ग डोला !
नटवा, सजवा वनमालेला तुमच्या बहिणीला !


वनमालांनो हळूंच हलवा हा हिरवा शेला,
सूत्रधार हा नभीं उदेला, उधळा सुमनांला !
‘जय’ शब्दानें आळविण्याला लोकनायकाला
नभोवितानीं द्या धाडुनि ही विहगांची माला !


सरोवराच्या फलकावरतीं स्वर्गाच्या छाया
कुणी रंगवा, कुणी फुलांवर लागा नाचाया !
वेलींच्या वलयांत बसोनी गा कोणी गाणीं,
या झाडावर त्या झाडावर हंसत सुटा कोणी.


कोणीकुणी या नदीबरोबर नाचत जा बाई,
प्रपातांतही बसुन गा कुणी मंजुळ शब्दांहीं,
उष:कालच्या सुगंध, शीतल मृदृल मंद वाता !
विहार कर, ये पराग उधळित अवनीवर आतां !


या कोमल रविकिरणांवरतीं स्वर्ग बसुनि आला,
सख्या मारुता, गाउनि, गाणीं झोंके दे त्याला !

ऊठ कोकिळा ! भारद्वाजा ! ऊठ गडे, आतां,
मंगल गानीं टाका मोहुनि जगताच्या चित्ता !
सरिते ! गाणें तुझें सुरांमधिं या मिळवीं बाई !
साध्याभोळ्या तुझ्या गायना खंड मुळीं नाहीं !


पिंवळीं कुरणें या गाण्यानें हर्षोत्कट झालीं,
गाउं लागलीं, नाचुं लागलीं, बेडावुनि गेलीं !
चराचरांच्या चित्तीं भरलें दिव्याचें गान !
मूर्त गान हें दिव्य तयाला गाणारें कोण ?


दिव्य गायनें, दिव्य शांतता, दिव्याचे झोत,
वसुंधरेच्या अरुण ओतितो नकळत हृदयांत !
त्या दिव्यानें स्वर्भूमीचें ऐक्य असें केलें;
त्या दिव्यानें मांगल्याचे पाट सुरू झाले !


मंगलता ती दिव्य कवीला टाकी मोहोनी,
वाग्देवीने सहज गुंफिलीं मग त्याचीं गाणीं,


कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी)


कवितेचा सोपा सारांश:

१. पहाटेचे विलोभनीय दृश्य: कवी म्हणतात की, पूर्व दिशेला सोन्यासारखी पिवळी आणि गुलालासारखी लाल उधळण झाली आहे. जणू काही सृष्टीरूपी स्त्रीने आपल्या गळ्यात एक मौल्यवान दागिनाच घातला आहे. आकाशातील ढग निरनिराळ्या रंगांनी नटले आहेत, जणू काही स्वर्गातील सोन्याची गंगाच तिथून वाहत आहे.

२. विविध कल्पना आणि रूपके: हा प्रकाश पाहून कवीच्या मनात अनेक विचार येतात:

  • हा कोणी चित्रकार (अरुण) नभाचे अंगण रंगवत आहे का?
  • की ‘उषा’ नावाची सुंदरी आपल्या हातांनी अंगणात रांगोळी काढत आहे?
  • की रात्रीने सांडलेली मोत्यांची माळ चोरीला गेल्यामुळे आकाश रुसून लाल झाले आहे?
  • कवीला असे वाटते की जणू प्रत्यक्ष प्रभू रामाचे ‘पुष्पक विमान’ किंवा सोन्याची ‘द्वारका नगरी’च आकाशात चमकत आहे.

३. निसर्गाचा उत्सव: सकाळचा हा समय म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर तो ‘प्रेमाचा उत्सव’ आहे. दिशा एकमेकींशी बोलत आहेत की आता विरहाचा काळ (रात्र) संपला असून आनंदाची गाणी गाण्याची वेळ आली आहे. कृष्ण आणि गवळणींच्या गोपाळकाल्याप्रमाणे आकाशात रंगांचा खेळ सुरू झाला आहे.

४. पृथ्वीवरील आनंद: सूर्योदयाच्या या लाटेपुढे संपूर्ण ब्रह्मांड नतमस्तक होत आहे. पृथ्वीवरील दवबिंदू हे जणू लज्जेचे प्रतीक आहेत. कवी आपल्या कवितेलाही सांगतो की, तू आता लाजू नकोस, तर या मंगल समयी आनंदाने डोल.

५. सर्व सृष्टीला आवाहन: कवी निसर्गातील प्रत्येक घटकाला या उत्सवात सामील व्हायला सांगतात:

  • डोंगर: आपल्या शिखरांवर हा प्रकाश झेलून घ्या.
  • वनदेवी आणि वेली: आपला हिरवा शालू नेसून आनंदाने डोला.
  • पक्षी: कोकिळा आणि भारद्वाज पक्षांनी आपली मंजूळ गाणी गाऊन जगाला मोहून टाकावे.
  • नद्या आणि वारे: नद्यांनी गाणी गावीत आणि वाऱ्याने फुलांचा सुगंध सगळीकडे पसरावा.

६. समारोप (दिव्य ऐक्य): शेवटी कवी म्हणतात की, हा सूर्योदय म्हणजे केवळ नैसर्गिक घटना नसून, तो स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडणारा एक धागा आहे. या प्रकाशामुळे चराचरात मांगल्य पसरले आहे आणि त्यातूनच निसर्गाची ही दिव्य गाणी (कविता) जन्माला आली आहेत.


थोडक्यात सांगायचे तर: ही कविता निसर्गाच्या सौंदर्याचे, सकाळच्या प्रसन्नतेचे आणि सर्व सृष्टीमध्ये पसरलेल्या ईश्वरी प्रेमाचे एक सुंदर दर्शन घडवते.

🔗 हा लेख शेअर करा

WhatsApp Facebook Twitter

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *