गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !
कडयावरुनि घेऊन उडया खेळ लतावलयीं फुगडया.
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभंवतीं;
जा हळुहळु वळसे घेत लपत – छपत हिरवाळींत;
पाचूंचीं हिरवीं रानें झुलव गडे, झुळझुळ गानें !
वसंतमंडप – वनराई आंब्याची पुढतीं येई.
श्रमलासी खेळुनि खेळ नीज सुखें क्षणभर बाळ !
हीं पुढचीं पिंवळीं शेतें सळसळती – गाती गीतें;
झोंप कोठुनी तुला तरी, हांस लाडक्या ! नाच करीं,
बालझरा तूं वालगुणी, बाल्यचि रे ! भरिसी भुवनीं !
बालतरू हे चोंहिकडे ताल तुला देतात गडे !
प्रेमभरें त्यांवर तूंहि मुक्त – मणि उधळुनि देई !
बुदबुद – लहरी फुलवेली फुलव सारख्या भंवतालीं,
सौंदर्ये हृदयांमधली दे विश्वीं उधळून खुलीं !
गर्द सावल्या सुखदायी वेलींची फुगडी होई !
इवलालीं गवतावरतीं रानफुलें फुलती हंसती,
झुलवित अपुले तुरे – तुरे निळी लव्हाळी दाट भरे.
जादूनेंच तुझ्या बा रे ? वन नंदन बनलें सारें !
सौंदर्याचा दिव्य झरा बालवसंतचि तूं चतुरा;
या लहरीलहरीमधुनी स्फूर्ति दिव्य भरिसी बिपिनीं
आकाशामधुनी जाती मेघांच्या सुंदर पंक्ति;
इंद्रधनूची कमान ती ती संध्या खुलते वरतीं;
रम्य तारका लुकलुकती नीलारुण फलकावरतीं;
शुभ्र चंद्रिका नाच करी स्वर्गधरेवर एकपरी;
हीं दिव्यें येती तुजला रात्रंदिन भेटायाला !
वेधुनि त्यांच्या तेजानें विसरुनियां अवधीं भानें
धुंद हृदय तव परोपरी मग उसळी लहरीलहरी
त्या लहरीमधुनी झरती दिव्य तुझ्या संगौततति !
नवल न, त्या प्राशायाला स्वर्गहि जर भूवर आला !
गंधर्वा ! तव गायन रे वेड लाविना कुणा बरें !
पर्वत हा, ही दरीदरीं तव गीतें भरलीं सारीं,
गाण्यानें भरलीं रानें, वर – खालीं गाणें गाणें !
गीतमय स्थिरचर झालें ! गीतमय ब्रम्हांड डुले !
व्यक्त तसें अव्यक्तहि तें तव गीतें डुलतें डुले !
मुरलीच्या काढित ताना वृंदावनिं खेळे कान्हा;
धुंद करुनि तो नादगुणें जडताही हंसवी गानें;
दिव्य तयाच्या वेणुपरी तूंहि निर्झरा ! नवलपरी
गाऊनि हें झुळझुल गान विश्वाचें हरिसी भान !
गोपि तुझ्या हिरव्या वेली रास खेळती भंवतालीं !
तुझ्या वेणुचा सूर तरी चराचरावर राज्य करी !
काव्यदेविचा प्राण खरा तूंच निर्झरा ! कवीश्वरा !
या दिव्याच्या धुंदिगुणें दिव्याला गासी गार्णे,
मी कवितेचा दास, मला कवी बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानीं दिव्यांची असली श्रेणी !
जडतेला खिळुनी राही हृदयबंध उकलत नाहीं !
दिव्यरसीं विरणें जीव जीवित हें याचें नांव;
तें जीवित न मिले मातें मग कुठुनी असलीं गीतें ?
दिव्यांची सुंदर माला ओंवाळी अक्षय तुजला !
तूंच खरा कविराज गुणी सरस्वतीचा कंठमणि
अक्षय तव गायन वाहे अक्षयांत नांदत राहे !
शिकवी रे, शिकवी मातें दिव्य तुझीं असलीं गीतें !
फुलवेली – लहरी असल्या मम हृदयीं उसळोत खुल्या !
वृत्तिलता ठायीं ठायीं ठायीं विकसूं दे सौंदर्यांहीं !
प्रेमझरी – काव्यस्फूर्ति ती आत्मज्योती चित्तीं
प्रगटवुनी चौदा भुवनीं दिव्य तिचे पसरी पाणी !
अद्वैताचें राज्य गडे ! अविच्छिन्न मग चोहिंकडे !
प्रेमशांतिसौंदर्यांहिं वेडावुनी वसुधामाई
मम हृदयीं गाइल गाणीं रम्य तुझ्या झुळझुळ वाणी !
आणि जसें सगळें रान गातें तव मंजुळ गान,
तेंवि सृष्टिची सतार ही गाइलं मम गाणीं कांहीं !
कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी)
कवितेचा सारांश: ‘निर्झरास’ (झऱ्याला संबोधन)
१. झऱ्याचे बालपण आणि खेळ: कवी झऱ्याला एका लहान मुलासारखे मानतात. हा झरा डोंगरावरून उड्या मारत, दऱ्याखोऱ्यांतून घुमत आणि वेलींशी फुगडी खेळत येतो. कधी तो खडकावर लोळण घेतो, तर कधी हिरवळीत लपाछपी खेळतो. आंब्याच्या वनराईत आल्यावर कवी त्याला म्हणतात, “बाळा, आता तू खूप खेळला आहेस, थोडा वेळ विश्रांती घे.” पण झरा इतका उत्साही आहे की तो थांबत नाही.
२. निसर्गाचे नंदनवन: झरा आपल्यासोबत चैतन्य घेऊन येतो. त्याच्या झुळझुळण्यामुळे पाचूची हिरवी रानं डोलू लागतात. तो खडकांवर पाण्याचे तुषार उडवतो, जणू काही तो मोत्यांची उधळण करत आहे. झऱ्याच्या स्पर्शामुळेच गवतावर रानफुलं हसू लागतात आणि संपूर्ण वन ‘नंदनवन’ बनून जाते. कवी त्याला ‘सौंदर्याचा दिव्य झरा’ आणि ‘चतुर वसंत’ म्हणतात.
३. वैश्विक संवाद: आकाशातील ढग, इंद्रधनुष्य, संध्याकाळचे रंग, चांदणे आणि तारका हे सगळे या झऱ्याला भेटायला येतात. या नैसर्गिक सौंदर्याने झरा इतका धुंद होतो की त्याच्या लहरींमधून दिव्य संगीत निर्माण होते. कवी म्हणतात की, तुझे हे गाणे ऐकायला स्वर्गही पृथ्वीवर येईल इतके ते गोड आहे.
४. कृष्ण आणि निर्झर (झरा): कवी झऱ्याची तुलना श्रीकृष्णाच्या मुरलीशी करतात. जसा कृष्ण वृंदावनात मुरली वाजवून चराचराला (दगड-मातीलाही) जिवंत करतो, तसाच हा झरा आपल्या झुळझुळ नादाने विश्वाचे भान हरवून टाकतो. त्याच्या भोवती असणाऱ्या हिरव्या वेली म्हणजे जणू रास खेळणाऱ्या गवळणीच आहेत.
५. कवीची कबुली आणि प्रार्थना: कवितेच्या शेवटच्या भागात बालकवी स्वतःची तुलना झऱ्याशी करतात. ते म्हणतात:
- “तूच खरा कवीश्वर आहेस, कारण तुझे गाणे नैसर्गिक आणि दिव्य आहे.”
- “मी तर जगाचा एक सामान्य कवी आहे. माझे मन संसाराच्या जड साखळदंडात अडकले आहे, त्यामुळे तुझ्यासारखी दिव्य गाणी मला सुचत नाहीत.”
६. अंतिम इच्छा: कवी झऱ्याकडे प्रार्थना करतात की, “मलाही तुझ्यासारखी दिव्य गाणी शिकव. माझ्या मनातही प्रेमाचा आणि सौंदर्याचा झरा वाहू दे. जसे संपूर्ण रान तुझ्या गाण्याने डोलते, तसेच या सृष्टीने माझेही गाणे आनंदाने गावे, अशी शक्ती मला दे.”
कवितेतील काही महत्त्वाचे शब्द:
- निर्झर: झरा.
- लतावलयी: वेलींच्या गराड्यात.
- विपिन: जंगल / वन.
- नभ:प्रांगण: आकाशरूपी अंगण.
- अद्वैत: दोन नसून एक असण्याची भावना (ईश्वर आणि निसर्ग एकच).

Leave a Reply