अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ,
बघतां बघतां त्यास रंगलें वारुणिचें चित्त,
हळुंच पाहते, मधुर हांसते, जाते लाजून,
म्हणे मनाशीं, ‘जीव टाकुं का हा ओवाळून !’
प्रेमनिर्भरा बघुन सखीला भास्कर मायावी
जातां जातां साखरचुंबा एक तिचा घेई !
लाजलाजुनी जीव सतीचा मग अर्धा झाला,
त्यांतच आल्या रोषाच्याही लहरी गालाला !
गेला, झाला द्दष्टिआडही सूर्य, तरी अजुनी
पहा चकते प्रेमपताका पश्चिमदिग्वदनीं,
थक्क होऊनी दिशा म्हणाल्या ‘काय मोहिनी ही !
प्रेमसमाधी अजुनि खुळीची या उतरत नाहीं !’
‘किती पश्चिमे ! आतां त्याचें चिंतन करशील ?
द्दष्टि लावुनी अशीच बसशिल सांग किती वेळ ?
खिन्नपणा हा पुरे, पुरे अश्रुंची माळ !
उद्यां बरं का तो राणीला अपुल्या भेटेल.
संध्येच्या खिडकींत येऊनी ही हंसरी तारा,
हळुंच पाहते. सुणावितेही ‘या – या’ कोणाला ?
पलिकडचा तो तेजोमन नव पडदा सारून
बघते, हंसते, क्षणांत लपते, ही दूसरी कोण ?
लाजत लाजत असाच येइल सारा स्वलोंक,
मुग्ध बालिका जमतिल गगनीं आतां नवलाख.
प्रथम तारके ! पहा सखी तब एक पुढें आली
ही दुसरी, ही तिसरी – आतां कितितरी भंवतालीं !
आली होती भरती आतां अस्तसमुद्राला,
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिक्रमाला !
कल्पतरूचीं फुलें उडालीं कीं वार्यावरती ?
आकाशींच्या गंगेला कीं बुदबुद हे येती ?
नवटिकल्यांची चंद्रकळा कीं गगनश्री नेसे ?
स्वर्गींचें भांडार उघडलें कीं रात्रीसरसें ?
विश्वशिरावर ठोप चढविला हिर्यामाणकांचा !
मंगल, मंगल, जिकडे तिकडे जय मांगल्याचा !
रजनीदेवी ! वैभवशाली तूं अमुची राणी,
हीं नक्षत्रें, तारा सार्या, लीन तुझ्या चरणीं.
ज्याच्या त्याच्या तारा वांटुन दे ग्रहगोलांना,
गगनमंडलीं फेर धरुं दे प्रेमाचा त्यांना
दिशादिशांला तुझीं गाउनी प्रेमाचीं गाणीं
रजनीदेवी ! विश्व टाक हें प्रेमें भारोनी !
काळ्या काळ्या या पडणार्या अंधारासंगें
ब्रम्हांडाचें हृदय नाचवी प्रेमाच्या रंगें !
काळ्या अंधारांत खेळतें विश्व लपंडाव,
तार्यांवरती बसून बघती तें कौतुक देव.
दहा दिशांनीं पांघरूनि या काळ्या बुरख्याला
काळा बागुल काळोखाचा एक उभा केला.
मंद मंद तेजांत शोधिते गगनश्री त्यांना,
पाजळूनि हे नक्षत्रांचे रत्नमणी नाना.
खेळ चालला एकसारखा हा खालींवरतीं,
पूर्व दिशाहि तोंच हांसली, सांपडली हातीं
उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही !
कीं गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई.
हे मेघांचे धुऊन पडदे स्वच्छ कुणीं केले ?
मंगल मंगल तेज चहुंकडे कुठुनि बरें आलें ?
अर्ध्या मिटल्या अर्ध्या उघडया असल्या नयनांनीं
कुणास बघती दिशा कळेना मंदस्मित करुनी ?
पहा उदेला दिव्य गोल हा – छे ! भलतं कांहीं !
हा तारांचा सखा तयांना भेटाया येई.
तुमची राणी बसे सारखी तुम्हां न्याहाळीत,
गगनाच्या चौकांत चला हो, या रजनीनाथ !
धवल चंद्रिके ! दे आलिंगन दिव्य यामिनीला,
बहिणी – बहिणी तुम्ही सुखानें चंद्राशीं खेळा !
कां तारांनो ! तुम्ही लाजतां ? हा मंगला काल !
निर्मत्सर व्हा, प्रेमसंगमीं पोहा चिरकाल.
ब्रम्हांडाचा गोल धरी या प्रेमाचा फेर
फुलें शांतिचीं पहा उधळलीं जगतीं चौफेर !
निज निज आतां म्हणे जगाला वत्सलता माता,
रजनीदेवी गात बैसली अंगाईगीतां,
गगनाच्या या शेजेवरतीं निजवा तारांना,
चंद्रा ! दे ओढणी तुझ्या नव तेजाची त्यांना
हंसतां हंसतां झोंप लागली दहा दिशांनाहि,
ब्रम्हांडाचा गोल डोलतो, पण जागा नाहीं !
या प्रेमाला गातां कविचेंही चित्त
प्रेमाच्या निद्रेंत रंगलें पाठ गात गात.
कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी)
कवितेचा सारांश: अस्तगिरी ते चंद्रोदय
१. सूर्यास्ताचा शृंगार: कविता सुरू होते ती मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या (निजनाथ) वर्णनाने. सूर्य अस्ताला जाताना पश्चिम दिशा (वारुणी) लाजून मधुर हसते. जाता जाता सूर्य तिला एक ‘साखरचुंबा’ देतो (क्षितिजावरचा लाल रंग). सूर्य मावळल्यावरही पश्चिमेच्या गालावर जो लाल रंग उरला आहे, त्याला कवी ‘प्रेमाची पताका’ म्हणतात. इतर दिशा तिला चिडवतात की, “आता पुरे झाले हे रडणे, तुझा प्रियकर उद्या पुन्हा तुला भेटायला येईल.”
२. चांदण्यांचे आगमन: हळूहळू आकाशात एक-एक करून ताऱ्यांच्या सुंदर ‘मुग्ध बालिका’ जमायला लागतात. कवी विचारतात, “हे ताऱ्यांचे थवे म्हणजे समुद्रातून सांडलेल्या मोत्यांच्या माळा आहेत की आकाशातील गंगेवर आलेले पाण्याचे बुडबुडे?” संपूर्ण आकाश हिऱ्या-माणकांनी जडवल्यासारखे आणि नक्षत्रांच्या टिकल्या लावलेल्या चंद्रकळेसारखे (साडीसारखे) मंगलमय दिसते.
३. रजनीदेवीचे वैभव: रात्रीला कवी ‘रजनीदेवी’ म्हणतो. ही रात्र म्हणजे विश्वाची राणी आहे आणि सर्व नक्षत्र-तारे तिच्या चरणी लीन आहेत. हा काळा अंधार भीतीदायक नसून तो प्रेमाच्या रंगात विश्वाला नाचवणारा आहे. अंधार आणि प्रकाश यांच्यात जणू संपूर्ण विश्व ‘लपाछपी’ खेळत आहे, असे कवीला वाटते.
४. चंद्रोदय आणि चंद्राची भेट: शेवटी उदयगिरीवर (पूर्वेला) नवीन प्रकाशाची पताका दिसते. हा ‘तारांचा सखा’ म्हणजेच चंद्र उगवला आहे. कवी चंद्राला आणि चांदण्याला (धवल चंद्रिका) आवाहन करतात की, तुम्ही आता या रात्रीला आलिंगन द्या. हे सगळे निसर्गाचे घटक (चंद्र, तारा, दिशा) कोणत्याही मत्सरशिवाय एकत्र येऊन प्रेमाच्या सागरात पोहत आहेत.
५. अंगाई गीत आणि निद्रा: शेवटी, रात्र ही आईसारखी ‘वत्सल’ होऊन जगाला अंगाई गीत गाते. ती ताऱ्यांना गगनाच्या शेजेवर (अंथरुणावर) निजवते आणि चंद्र आपल्या प्रकाशाची ‘ओढणी’ त्यांच्यावर पांघरतो. दहा दिशा हसत-हसत झोपी जातात आणि कवीचे मनही हे प्रेमाचे गाणे गाता गाता या निद्रेत रंगून जाते.
- कल्पकता: सूर्यास्ताला कवीने ‘साखरचुंबा’ म्हटले आहे, जे त्यांच्यातील हळव्या आणि रोमँटिक मनाचे दर्शन घडवते.
- निसर्गाचे मानवीकरण: दिशा, सूर्य, चंद्र आणि रात्र यांना माणसांसारख्या भावना देऊन बालकवींनी निसर्ग जिवंत केला आहे.
- शांतता आणि मांगल्य: रात्र म्हणजे भयाण काळ नसून ती एक ‘मंगल वेळ’ आहे, जिथे सृष्टी प्रेमाचा फेर धरते, हा सकारात्मक संदेश या कवितेतून मिळतो.

Leave a Reply